महाराष्ट्राप्रमाणेच परप्रांतात गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील मराठी बांधवही एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत आहेत. श्रावण संपून गणेशोत्सव सुरू झाला तरी इंदूरात मात्र गणेशोत्सवात श्रावणाचा अनुभव आला. निमित्त होते, प्रख्यात गायिका सावनी शेंडे यांच्या मैफलीचे. श्रावणात गायलं जाणारं गीत म्हणजे सावनी. त्यामुळे या श्रावणी भिजपावसाची आठवण सावनीताईंच्या चिंब सूरांनी श्रोतृवर्गाला करून दिली. श्री. गणेश मंडळात रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी इंदूरमधील दर्दी रसिकांनी गर्दी केली होती. सावनी यांनी आपल्या सुरावटीने केलेली गणेशवंदना श्रोत्यांना इतकी भावली की, आपसूक ओठातून 'क्या बात है...' ची दाद निघाली. सावनीच्या मैफलीची नि तिच्या प्रवासाचे हे काही ठळक टप्पे....
'पुरीया धनश्री'ने प्रारंभ या मैफलीचा औपचारीक प्रारंभ गणरायाच्या सुरेल आरतीने झाला. त्यानंतर मग सावनी यांनीच रचना केलेल्या पुरीया धनश्रीतील 'केसर रंग शाम सांज दुल्हन बनी' या बंदिशीने या स्वरयात्रेची सुरवात झाली. एकतालातील या बंदिशीवर रसिकही डोलत होते. 'क्या बात है' ची खास इंदुरी आवृत्तीही योग्य जागी ऐकू येत होती. आलाप आणि तानांची वलये जणू त्या वातावरणाला कवेत घेत होती. रसिकही त्यात अलगदपणे नकळत लपेटले जात होते.
|