दि. १५ एप्रिल कवीवर्य सुरेश भटांची जयंती. त्यानिमित्ताने....
रोज तुझ्या भेटीसाठी डोळे नक्षत्रे खुडती रोज तुझ्या भेटीसाठी बाहू आसवांचे होती
कविवर्य सुरेश भटांचा असा शेर कानावर आला की अंगावर सरर्कन काटा येतो. जीवनाच्या तत्वज्ञानाला गझलेच्या कोंदणात किती समर्पकपणे बसविले आहे. हळूवार, नाजूक किणकिण करणारे शब्द गझलेत, कवितेत लिहिणारे भट व्यवस्थेवर संतापून आसूड ओढताना लिहितात,
वार झेलायास केली मी खुली छाती जरी नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले
दोन वेगळ्या भावनांची अभिव्यक्ती किती सशक्त. भटांचा रंगच वेगळा. मराठी साहित्याला भरभरून देणारा हा कवी अत्यंत तरल प्रतिभेचा होता. तलम, मलमली लिहिताना नाजूक होणारी त्यांची लेखणी संतापली की अंगार ओकायची. भटांचा स्वभावही असाच दोलकासारखा होता.
अमरावतीत सुखवस्तू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिल व्यवसायाने डॉक्टर तर आई सामाजिक कार्यकर्ती. भट अडीच वर्षांचे असतानाच पोलिओमुळे त्यांना अपंगत्व आले. त्यांच्या आईला सामाजिक कार्यासोबतच कवितेतही गोडी होती. त्यांनी लहाणपणापासूनच लहान्या सुरेशवर काव्यसंस्कार केले.
मोठे होईपर्यंत भटांचा काव्यवृक्ष बहरला. त्यांना शिक्षणात फारशी गती नव्हतीच. पण शैक्षणिक गुणवत्ता व नैसर्गिक प्रतिभा दोन भिन्न गोष्टी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अमरावतीच्या प्रसिद्ध विदर्भ महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण करीत असताना खर्या अर्थाने त्यांच्या काव्य लेखनास गती मिळाली.
भटांचे जगणे सुरूवातीपासूनच अघळ पघळ. मित्रांच्या गोतावळ्यात फटकेबाजी करण्याची त्यांची आवड महाविद्यालयीन जीवनापासूनची. त्यांच्या जगण्यात व वृत्तीतील बेदरकारपणा हा त्यांच्या स्वभावातील स्थायीभावच. पण यातूनच त्यांची गझल, कविता नैसर्गिकपणेच बाहेर आली.
त्यांच्या कविता, गझलांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. मराठीत तोपर्यंत गझल लिहिण्याचा प्रयत्न माधव ज्युलियनांनी केला होता. पण खर्या अर्थाने हा उर्दू काव्यप्रकार मराठीत रूजविण्याचे काम भटांनी ऊर्फ दादांनी केले. केवळ गझल लिहूनच ते थांबले नाही, तर ही परंपरा पुढेही सुरू रहावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
त्यासाठी गझलेच्या कार्यशाळा घेतल्या. पुस्तिका काढल्या. अगदी नवोदित गझलकार असेल तर ते त्याची गझल दुरूस्त करून पाठवून देत. असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. गझलेसाठी त्यांच्या घराचा दरवाजा कायम उघडा असे. आज मराठी गझलेचा वृक्ष बराच उंच झाला आहे.
त्यांचे स्वतंत्र गझल संमेलनही भरू लागले आहे. पण याच्या मुळाशी सुरेश भटांचे प्रयत्न आहे हेही तितकेच खरे. भटांच्या कविताही खूप गाजल्या. त्यांची गाणी झाली. उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयूष्याच्या पेटवा मशाली! या कवितेचा वाक्प्रचार होऊन मराठीत राजमान्य झाला.
एखाद्या कवीची भाषेप्रती अशीही देणगी असू शकते. मेंदीच्या पानावर..., मलमली तारूण्य माझे... , केव्हातरी पहाटे... आज गोकूळात रंग खेळतो हरी..., यासारखी अजरामर गीतेही त्यांच्या लेखणीतून उतरली. समृद्ध शब्दभांडार असल्याने नेमके शब्द त्यांच्या गझलेत येतात. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
सुरेश भटांचे काव्यसंग्रह : रूपगंधा एल्गार रंभ माझा वेगळा झंझावात सप्तरंग
भट साहेबांची काही पुस्तके : गझलनामा ः गझलच्या बाबतीत एकमेव व उपयुक्त ग्रंथ आकाशगंगा ः खंडकाव्य मुक्तकमाला ः चार चार ओळींची वेचक मुक्तके
( छायाचित्र सौजन्य- सुरेश भट डॉट इन) |