मुख्य पृष्ठ > विविध > साहित्य > प्रसिध्द लेखक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
माणूसपण प्रवर्तित करणारा साहित्यिक
-विजय निरभवणे, नाशिक

baburao
PRPR
बाबूराव बागूल हे फक्त साहित्यिकाचं नाव नाही, तर आंबेडकरी प्रेरणेचा चिंतनशील मेंदू असलेला माणूस त्यांच्यापासून कधीही अलग होऊ शकला नाही. कविता, कथा, लेख, कादंबरी किंवा भाषणाच्या स्वरूपात असो माणूस हा नेहमीच त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. ‘मरण स्वस्त होत आहे’, ‘जेव्हा मी जात चोरली’ हे कथासंग्रह, ‘आसूड’, ‘अघोरी’, ‘कोंडी’ या कादंबर्‍या, ‘वेदाआधी तू होतास’ हा काव्यसंग्रह, आंबेडकर भारत (भाग-1 व 2), ‘दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान’ हे वैचारिक लेखन अशा प्रत्येक साहित्य प्रकाराच्या मुळाशी माणूस हा केंद्रबिंदू आहे.

याचं एक कारणही आहे. ते म्हणजे इथला प्रत्येक माणूस हा जात हे वास्तव घेऊनच जन्माला येतो आणि त्याच्या अंतापर्यंत जात त्याची सोबत करीत असते, हे वास्तव आबांच्या साहित्यातून स्पष्टपणे उठून दिसतं. म्हणूनच या व्यवस्थेचे कांगोरे त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक ओळीतून धारदारपणे पुढे येतात. ते माणसाच्या मनाला नुसते स्पर्शून जात नाहीत, तर या व्यवस्थेच्या बाहेर पडण्याचा विचारही देतात. हे विचार सामान्यातल्या सामान्य वाचकालाही व्यवस्था विद्रोही बनवतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,
उमर खय्याम, तुझी कविता वाचून वाटते,
आपणही उमर व्हावे... तरुण व्हावे.
पण मी जन्मलो या देशात.
इथे कोठली वही, कोठली सुरई,
इथे तर मी आजन्म कैदेत...
ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची
त्यांनीच ती सुधारली पाहिजे...
भीषण युद्घे करून... अथवा देशांतर करून...
या विद्रोहाची धार व्यवस्थेला चिरत जाते. पण तरीही फक्त विद्रोह निर्मिती करून हे साहित्य थांबत नाही, तर व्यवस्थेला बुद्घाचा धम्म हा एकमेव पर्याय असल्याचेसुद्घा ते ठामपणे प्रतिपादित करतात. बुद्घाच्या धम्माला ते मानवी विकास पर्यायानं राष्ट्र विकासाचा आधार मानतात.
जे स्वराज्यात, लोकशाहीत, कामगार सत्तेतही जनतेच्या बाजूचे असते त्यासाठी संघर्षरत असते, माणसाचे महात्म्य, मुक्ती आणि माणूस म्हणून असलेली त्याची महान प्रतिष्ठा त्याला प्राप्त करून देण्यासाठी जे लढत राहते ते म्हणजे दलितत्व म्हणजेच सम्यक क्रांतीत्व! अशी व्याख्या आबा करतात. मानवी समाजाचा इतिहास हा अन्याय अत्याचाराचा, युद्घाचा, पिळवणुकीचा, दडपशाहीचा, विषमतेचा, तुच्छता, तिरस्कार, श्रेष्ठ-कनिष्ठतेचा आणि अहंकाराचा इतिहास असल्याची मांडणी करून आबा म्हणतात, ही शेकडो वर्षांची घाण ग्रंथाग्रंथात, शब्दाशब्दांत मनामनांत आहे... या व्यवस्थेला पर्याय देताना दलित साहित्याकडे ते सम्यक क्रांतीत्वाच्या अपेक्षेनं बघतात. म्हणूनच आबांचं साहित्य फक्त मनामनात विद्रोह निर्माण करून थांबत नाही, तर त्यांच्या साहित्याला जाणीपूर्वक बुद्घाच्या करुणेची झालर लावलेली आढळते. भगवान बुद्घ ज्या अपार प्रेमाने, प्रकाशितपणे, करुणेने माणसाकडे बघतो, त्याच अपार करुणेने, प्रेमाने दलित साहित्य माणसाकडे बघते. अशा बघण्यातून, या अपार प्रेम करुणेतून सम्यक क्रांतीत्व साकारले आहे, असे आबा दलित साहित्याचे विश्लेषण करतात. त्याबरोबरच उद्याच्या युगाचे नायकत्व या साहित्याकडे बहाल करतात.

नाशिकच्या सम्यक प्रबोधन सभेनं धम्मचक्र प्रवर्तन सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या समता संगराची पन्नास वर्षे या ग्रंथाला अतिशय चिंतनशील प्रस्तावना लिहिताना आबा म्हणतात, ‘बुद्घांच्या विचारामुळेच ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञानात इतर बौद्घ राष्ट्रे आघाडीवर आहेत. अमेरिकन आदिवासी, भटके-विमुक्त होते. तसेच मूळ रहिवाशी, रेड इंडियन, आदिवासी यांना तिथल्या संस्कृतीनं एकत्र केलं. ही फक्त वरवरची एकात्मता नव्हती, तर रक्ताची नाती निर्माण करून त्यांनी संपूर्ण एकात्मता साधली. परिणामी अमेरिकेत नवसमाज निर्माण झाला. असंख्य गुणसूत्रांची, मेंदूंची एकात्मता आणि या एकात्मतेचा परिपाक आणि दृश्य आविष्कार म्हणजेच अमेरिका महासत्ता झाली.
1 | 2  >>  
आणखी
स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले
पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विश्वविक्रमाच्या वाटेवरचा ‘रहस्यमय’ प्रवास
गॉडफादरचा जन्म
`माहिती देणे म्हणजे शिक्षण नव्हे`
शिक्षकांविषयी ते म्हणतात...