मोबाईल गरजेची वस्तु बनण्याबरोबरच चैनीची वस्तु बनल्याची ओरड एकीकडे होत आहे. पण, मुलांचा अभ्यास आता मोबाईलवर आणण्याचे प्रयोग करत मोबाईल गरजेची वस्तु असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'इग्नू' (इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठ) ने मुलांचा क्लास मोबाईलवर आणण्याची अनोखी शक्कल लढवली आहे. आजकाल ग्रामीण भागातही मोबाईल सेवा पोहोचली आहे. मात्र, अनेक ठिकाणी चांगल्या दर्जाची शाळा-महाविद्यालये नाहीत. अशा ठिकाणी अत्याधुनिक आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी इग्नूने ही शक्कल लढविली आहे. 'इग्नू' आपल्या या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, संगीत, कला आदिंचा सहभाग करणार आहे. सिडीनंतर चक्क मोबाईलवर अभ्यासाची ही संकल्पना स्विकारली जाईल, आत शंकाच नाही. शिक्षणाचे महत्व आणखी वाढविण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ आणि टेक्स्टच्या मदतीने हा क्लास चालविला जाईल. यामुळे ग्रामीण भागातील मुलांकडूनही शहरातील मुलांच्या तोडीस तोड तयारी करून घेतली जाऊ शकेल आणि ही मुले कधीच मागे पडणार नाहीत, असा कंपनीला विश्वास आहे. ' इग्नू' चे कुलपती वी.एस.राजशेखरन पिल्लई यांनी सांगितले की, देशात मोबाईलधारकांची संख्या वाढत असताना प्रयोगही वाढत चालले आहेत. मोबाईलवरून शिक्षण देण्याच्या संकल्पनेला आम्ही 'एम-एजुकेशन' म्हणतो. या प्रोजेक्टसाठी कम्युनिकेशन आणि मॅन्युफैक्चरिंग ऑफ इंडियाची मदत मिळाली आहे. या कोर्सअंतर्गत आम्ही एड्ससारख्या विषयांनाही स्पर्श करून लोकांना जागृत करणार आहोत. लवकरच मोबाईलच्या काही कंपन्यांकडून हा कोर्स सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. |