'वैयक्तिक संगणकासाठी (पीसी) ६४० किलोबाईट्सही पुरेसे होतील,' हे विधान कधी काळी कुणी केल्यास त्याला आता आपण मुर्खात काढू की नाही? नक्कीच काढू. पण हे उद्गार काढणारी व्यक्ती बिल गेट्स असेल तर? उडालात ना? आजचा 'संगणेश' म्हटल्या जाणार्या बिल गेट्सने खरोखरच हे उद्गार काढले होते.
टि ३ या इलेक्ट्रॉनिक उपकरणांविषयी माहिती देणार्या नियतकालिकाने 'तंत्रज्ञानाविषयक आजपर्यंतची सर्वांत चुकीची भाकिते' या विषयावर विशेषांक काढला आहे. त्यात अनेक मान्यवरांची तंत्रज्ञानविषयक फोल ठरलेली भाकिते दिली आहेत. यात बिल गेट्ससह अनेक 'मान्यवरांचा' समावेश आहे.
ब्रिटिश उद्योगपती सर एलन सुगर यांनी टेलिग्राफला २००५ मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, 'पुढच्या ख्रिसमसपर्यंत आयपॉडचे अस्तित्व संपलेले असेल. समाप्त अगदी नष्ट झालेले असेल.' सुगर यांचे म्हणणे किती फोल ठरले ते आयपॉडच्या आजच्या प्रसारावरूनच कळून येते आहे.
आजपर्यंत तंत्रज्ञानविषयक फोल ठरलेली दहा भाकीते अशी. १. आयपॉड अजिबात चालणार नाहीत- सर एलन सुगर (२००५) २. घरात संगणकाची कधीही जरूर पडणार नाही- केन ओल्सेन, डिजीटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनचा संस्थापक (१९७७) ३. अण्विक विजेच्या आधारे असलेले व्हॅक्युम क्लिनर्स पुढच्या दहा वर्षात येण्याची शक्यता आहे.- एलेक्स लेऊट, लेऊट कॉर्पोरेशनचा अध्यक्ष. ४. टिव्ही फार काळ टिकणार नाही. कारण प्लायवूडच्या त्या खोक्याकडे रोज रात्री बघण्याचा लोकांनाच कंटाळा येईल.- डेरेल झानुक (१९४६) ५. १९३३ मध्ये बोईंग २४७ विमानाने उड्डाण केले. त्यावेळी त्यात दहा प्रवासी होते. या कामगिरीने अत्यानंदीत झालेल्या बोईंगच्या एका अभियंत्याने म्हटले होते, 'यापेक्षा मोठे विमान कधीच बांधले जाउ शकत नाही.' ६. 'आता आपण रॉकेट मेल सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहोत.'- अमरिकेचे पोस्टमास्टर जनरल ऑर्थर समरफिल्ड (१९५९) ७. वैयक्तिक संगणकात कुणालाही ६४० किलोबाईट्सपेक्षा जास्त मेमरीची जरूर भासणार नाही- बिल गेट्स, १९८१ ८. अमेरिकन लोकांना टेलिफोनची गरज असेल. आम्हाला नाही. कारण आमच्याकडे संदेशाचे आदानप्रदान करण्यासाठी भरपूर मुले आहेत. - सर विल्यम प्रीस, टपाल खात्याचे मुख्य अभियंता ( १८७८) ९. कचर्याचा प्रश्न (स्पॅम) मार्गी लागेल- बिल गेट्स (२००४) १०. क्ष किरण ही अफवा ठरेल- लॉर्ड केल्विन, रॉयल सोसायटीचे अध्यक्ष (१८८३) |