नागपूर- आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे माणूस माणसापासून दुरावलेला आहे, नाती - गोती संपलेली आहे तिथेच नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील वंडली (खुर्द) या गावाने केवळ ही नाती जोपासलीच नाही तर वैदर्भी आदरातिथ्याचा परिचयही संपूर्ण जगाला करून दिला. जिथे शेजारच्या मुलीचा तिच्या विवाहानंतर शेजार्यांनाच विसर पडत असतो तिथे गावातील मुलींची आठवण कशी राहणार.? पण, वंडली गावाने मात्र एक नवा आदर्श समोर ठेवताना या गावातून आजवर विवाह होऊन गेलेल्या सुमारे ३८२ लेकींचा आणि त्यांच्या नवर्यांचा अर्थातच गावच्या जावयांचा अनोखा सत्कार सोहळा घडवून आणला.
या गावातून विवाह होऊन गेलेल्या मुली महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात तर गेलेल्याच आहेत. शिवाय, त्यातील कुणी मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातही गेल्या आहेत. पण, आपल्या माहेरगावाने आपला आणि पतीदेवांचा सत्कार ठेवला असल्याचे कळताच या लेकी पुरत्या भारावून गेल्या. त्यांचे नवरेही या सत्काराच्या वृत्ताने आनंदित झाले होते.
मंगळवार, ३ नोव्हेंबर हा सत्काराचा दिवस होता. पण, आपल्या माहेरगावाला जायचे या आनंदाने दोन दिवस आधीपासूनच लेकी आणि जावयांचे गावात आगमन सुरू झाले होते. गावकरीही आपल्या लेकी आणि जावयांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. गावच्या वेशीवर तोरण बांधले होते. जावई आणि लेकीच्या स्वागताची सुरुवात त्या वेशीपासूनच सुरू व्हायची. गावचे आदरातिथ्य पाहून विविध भागातून आलेले जावई भारावून गेले होते.
सत्काराचा मुहूर्त सकाळी ११.३० चा होता. गावातील विठ्ठल-रूक्मिणी सभागृहात मोठा मंडप उभारण्यात आला होता. एकाचवेळी दहा जोडप्यांचा सत्कार करता येईल, अशी व्यवस्था होती. मंगळवारी सकाळीदेखील अनेक लेकी आणि जावयांचे आगमन झाले. दहा-दहाच्या जोडप्याने बोलावून सत्कार समारंभ सुरू झाला.
जावयाला कपडे आणि मोत्याची माळ तर लेकीला साडीचोळी आणि चांदीचा करंडा भेटीदाखल देण्यात आला. यानंतर सुरुवात झाली पाहुणचाराची. पाहुणचार होता पुरणपोळीचा ! या हृद सत्कारात ८४ वर्षीय जोडपे हे सर्वात वयोवृद्ध होते. या सत्काराने गावच्या सर्व लेकी आणि जावई तर भारावलेच. शिवाय, आसपासच्या दहा गावांमधील उपस्थित शेकडो नागरिकांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळत होते.