| | महाराष्ट्र ही संतांची भूमी. या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, या चार भावंडांसोबतच, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, कर्ममेळा, गोरा कुंभार, सावता माळी, संत जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार यांसारख्या संतांची मांदियाळी निर्माण झाली. चार्तुवर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि क्षुद्र असे चार वर्गाचे समाजात विभाजन झाले होते.
वेद पुराणातील तत्त्वज्ञान समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचू शकत नव्हते. संस्कृतसारख्या अवघड भाषेतील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडील होते. आणि म्हणूनच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदिपिका) सारखा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. |