गुजरातमध्ये सर्वच धर्मियांचे असे एक श्रध्दास्थान आहे, जिथे नमाज अदा करणे हे पुण्याचे आहे, असे मुस्लिम बांधव मानतात, तर हिंदू बांधवही नवस करतात. या श्रद्धास्थानामुळे जाती-धर्मापलीकडे जाऊन जातीय सलोखा प्रस्थापित केला जातो. धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहेत, गुजरातमधील उनावा या छोट्याशा गावी. तेथे असलेल्या मीरा दातार या पवित्र दर्ग्याचे दर्शन आम्ही आपल्याला घडवतो.
उत्तर गुजरातमध्ये मेहसाणापासून पालनपूर रस्त्यावर साधारण 19 किलोमीटवर उनावा हे छोटे गाव आहे. या कृषी संपन्न गावात हजरत मीरा सैय्यद अली दातार यांचा पवित्र दर्गा आहे. या दर्ग्यामुळेच या गावाचे नाव देश-विदेशात पोहचले आहे.
गावाच्या प्रवेशद्वारावरच सुमारे 600 वर्षांपूर्वी उभारलेला सैय्यद मीरा दातार दर्गा आहे. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर हिंदू बांधवही मोठ्या भक्तिभावाने या दर्ग्यात येतात. येथे नतमस्तक झाले की इडापिडा टळून अनेक आजारही दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या दर्ग्याला ऐतिहासिक वारसा आहे. एक हिंदू कवी शाह सोरठ यांनी सैय्यद अली यांना मीरा दातार असे नाव दिले होते. मीरा म्हणजे मानव जातीवर प्रेम करणारा व दातारचा अर्थ दानशूर असा आहे. तेव्हा पासून सैय्यद अली मीरा दातार या नावानेच ओळखले जातात.
हजरत सैय्यद अली मीरा दातार यांचे पूर्वज बुखाराहून भारतात आले होते. त्यांचा जन्म मुस्लिम तारीखेनुसार 29 रमजानमध्ये 879 हिजरीत अहमदाबादमधील खानपूर परिसरातील सैय्यदवाडा येथे झाला होता. ते 16 वर्षांचे असताना मध्य प्रदेशातील मोडुगढमध्ये एका जादूगाराची दहशत पसरली होती. त्याच्याशी दोन हात करायला कोणाचीच हिंमत होत नव्हती. तेव्हा सैय्यद अलीने त्या जादूगाराला संपवून मोडुगढला मुक्त केले.
मुस्लिम तारखेनुसार 29 सफर 898 हिजरीच्या दिवशी ते शहीद झाले व त्यांना उनावा या गावात दफन केले. तेव्हापासून त्यांच्या दर्गावर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात.
या दर्ग्यात परंपरागत धार्मिक पूजा पठणासोबत औषधेही दिली जातात, अशी माहिती दर्गा ट्रस्टचे सैय्यद छोटू मिया यांनी दिली. त्यांनी सांगितले, की राज्य शासनाच्या सहकार्याने येथे दवाखाना उघडण्यात आला असून आठवड्याच्या दर मंगळवारी डॉक्टर येतात व रोग्यांवर विनाशुल्क उपचार करतात.
कसे पोहचाल? हवाई मार्ग : देशातील सर्व महानगरातून व मोठ्या शहरांतून आपण अहमदाबाद येथे विमानाने पोहचू शकता. अहमदाबाद येथून उनावा येथे जाण्याकरता बस अथवा खाजगी वाहन सहज मिळते.
रेल्वे मार्ग : उनावा हे गाव उंझा व मेहसाणा रेल्वे स्थानकापासून 19 कि. मी. अंतरावर आहे.
महामार्ग : उनावा हे गाव दिल्ली-पालनपूर-अहमदाबाद या महामार्गावर आहे. तसेच अहमदाबाद व पालनपूर येथून वाहने मिळतात.
|