भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने अमेरिकेसारख्या त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची सूचना पराराष्ट्रा राज्यमंत्री शशी थरुरु यांनी केली. या सूचनेचे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियॉंदाद याने स्वागत केले आहे.
थरुर यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांच्यासह 'शॅडोज ऍक्रॉस द प्लेईंग फिल्डस् - सिक्स्टी इयर्स ऑफ इंडिया-पाकिस्तान क्रिकेट' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी थरुर यांनी भारत- पाकिस्तान यांच्यात त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळविण्याची सूचना केली.
या संदर्भात बोलताना मियॉंदाद म्हणाला की, श्री.थरुर यांनी व्यक्त केलेले विचार स्वागत योग्य आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट प्रेमींना सामने हवे आहेत. मग हे सामने अमेरिकेत झाले तरी चालतील. भारत आणि पाकिस्तानने एका क्रिकेट परिषदेची स्थापना करावी. या परिषदेत दोन्ही देशांमधील महान खेळाडू असावेत, असे मतही मियॉंदादने व्यक्त केले.