प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे ऑस्ट्रेलियाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 24 धावांनी पराभव केला. या विजयामुळे सात सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरी आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डग बोलिंगर आणि वॉटसनने भारताच्या तीन, तीन फलंदाजांना बाद केले.
विजयासाठी 251 धावांचे आव्हान घेवून उतरलेल्या भारताकडून वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी आक्रमक सुरवात केली. एका बाजूने सेहवाग धुवांधार फलंदाजी करीत होता तर सचिन त्याला साथ देत होता. सेहवाग फटकेबाजीच्या नादात बोलिंगरच्या गोलंदाजीवर वॉटसनकडे झेल देवून बाद झाला. त्याने 19 चेंडूत सात चौकारांसह 30 धावा केल्या. ही जोडी फुटल्यावर गंभीरचा जागी संघात आलेला विराट कोहली अपयशी ठरला. दहा धावांवर तो बाद झाला. त्या पाठोपाठ सचिनही 40 धावांवर बाद झाला. 17 हजार धावांसाठी त्याला सात धावा कमी पडला.
पहिल तीन फलंदाज 94 धावांवर बाद झाल्यानंतर युवराज आणि कर्णधार धोनीकडे सर्व लक्ष लागले. परंतु ही जोडी मागील सामन्याप्रमाणे फलंदाजी करु शकली नाही. युवराज 12 तर धोनी 26 धावांवर बाद झाला. सुरेश रैना 17 आणि रवींद्र जडेजा यांनाही चमक दाखविता आली नाही. त्यानंतर हरभजनसिंग आणि प्रविणकुमार या जोडीकडे लक्ष केंद्रीत झाले. हरभजनने धुवांधार फलंदाजीही सुरु केली. परंतु शेन वॉटसनने त्याला कॉट एंड बोल्ड बाद करुन भारताच्या आशा संपुष्टात आणल्या. हरभजनने 25 चेंडूत 31 धावांची खेळी केली. भारताचा डाव 226 धावांवर संपुष्टात
तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार महेद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात सलामीस आलेला कर्णधार रिकी पॉंटिगने यावेळी शेन वॉटसनबरोबर शॉन मार्शला सलामीस पाठविले. परंतु मार्शला अशिष नेहराने पाच धावांवर पायचित बाद करुन ऑस्ट्रेलियास पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉटसन आणि रिकी पॉंटिग यांची जोडी जमली. या जोडीने संघाचे अर्धशतक फलकावर लावले. वॉटसन वैयक्तीक अर्धशतकाच्या वाटेवर असताना हरभजनसिंगने त्याला 49 धावांवर बाद करुन भारताला दुसरे यश मिळवून दिले. मालिकेत सातत्याने धावा करणार्या पॉंटिग रवींद्र जडेजाच्या सुंदर फेकीमुळे 52 धावांवर धावचित बाद झाला. त्याने 59 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकारासह 52 धावांची खेळी केली. पॉंटिग बाद झाल्यानंतर कॅमेरॉन व्हाइट आणि मायकल हसी यांनी संघाची सूत्र हाती घेतली. ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी मोठी धावसंख्या उभी करेल, असे वाटत असताना हसीला 40 धावांवर युवराजने बाद केले. त्यानंतर कॅमेरॉन व्हाइट सहा धावांवर बाद झाला. व्हाइट अशिष नेहराच्या फेकीवर 62 धावांवर धावचित झाला. ऑस्ट्रेलियाने निर्धारीत 50 षटकात सर्व गडी गमावून 250 धावा केल्या. भारताकडून आशिष नेहराने तीन तर हरभजनसिंगने दोन जणांना बाद केले. युवराजने एक बळी मिळविला. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज धावचित बाद झाले.