गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली. परंतु फलंदाजांनी निराशा केली. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सांगितले. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 24 धावांनी पराभव केला.
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, मोहालीच्या चांगल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियालास 250 धावांमध्ये रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. फिरकीपटूंबरोबर वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. तसेच मागील दीड वर्षात भारतीय क्षेत्ररक्षकांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. परंतु फलंदाजांनी निराशा केली. 251 धावांचे आव्हान हे मोठे नव्हते. डावात एकही मोठी भागेदारी रचण्यात यश आले नाही. यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागल्याचे धोनीने सांगितले.