आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने शानदार प्रदर्शन कायम ठेवत सलग दुसर्या विजयाची नोंद केली. भारताने थायलंडवर 15-0 अशी मात केली.
पहिल्या सामन्यात भारताने सिंगापुरचा 13-0असा धुव्वा उडवला होता. सलग दोन विजय मिळवणार्या भारतीय संघाचे सहा गुण झाले असून त्यांना बाद फेरीत धडक देण्यासाठी केवळ एकाच विजयाची गरज आहे. आघाडीच्या फळीतील राणी रामफल भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. पूर्वार्धात दोन गोल करणार्या राणीने उत्तरार्धात आणखी चार गोल केले. राणीच्या ड्रिब्लिंगच्या सुरेख कौशल्याने थायलंडच्या खेळाडूंसमोर बचावापेक्षा तिला रोखण्याचेच काम त्यांना अधिक करावे लागले.